International Day of Yoga

International Day of Yoga

यंदाचा आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन (International Day of Yoga) “मानवतेसाठी योग” (Yoga for Humanity) या संकल्पनेवर आधारित असेल. 21 जून 2022 रोजी भारतासह संपूर्ण जगभरात साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनासाठी आयुष मंत्रालयाने या संकल्पनेची निवड केली आहे.
योग ही एक अशी शक्ती आहे ज्यामुळे आनंद, आरोग्य आणि शांती यांचा अनुभव अंतर्मनाने घेता येतो आणि ती व्यक्तीच्या आंतरिक चेतना आणि बाह्य जग यांच्यातील सतत संबंधाची जाणीव वाढवते.
शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग अधिक महत्त्वाचा आहे. योग केल्याने आपल्याला प्रसन्न तर वाटतेच आणि इतर अनेक समस्यांपासून आपली सुटका देखील होते
योग” हा शब्द स्वतःच एक संपूर्ण विज्ञानासारखा आहे जो शरीर, मन, आत्मा आणि विश्वाला एकत्र करतो. योगाचा इतिहास सुमारे ५००० वर्ष जुना आहे, जो प्राचीन भारतीय तत्वज्ञानात मन आणि शरीराचा अभ्यास म्हणून ओळखला जातो. योगाच्या विविध शैली शारीरिक आसने, श्वासोच्छ्वासाची तंत्रे आणि ध्यान किंवा विश्रांती एकत्र करतात. जीवनशैलीचे संपूर्ण सार योगाच्या विज्ञानात आत्मसात केले गेले आहे.

आता प्रश्न उद्भवतो की फक्त २१ जून का? उत्तर आहे – २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि जगाच्या अनेक भागात त्याचे विशेष महत्त्व आहे, म्हणून माननीय पंतप्रधानांनी हा दिवस सुचवला.

या दिवशी फक्त भारतात नव्हे पूर्ण जगभरात दिवस योगप्रेमी उत्साहात साजरा करू लागले। सकाळची सुरवात भव्य योग शिबिराने करून नंतर एकमेकांना योग दिनाच्या शुभेच्छा देऊन दिवसाची सुरवात केली जाते.

अष्टांग योग म्हणजेच-यम,नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याचं पालन केल्यास खालील फायदे दिसतात

ताण तणावा पासून मुक्ती

रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणार्‍या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा रोज केलेला सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नष्ट करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातली विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर टाकली जातात.

अंतर्ज्ञानात वाढ
तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करण्याची क्षमता योगा आणि ध्यान धारणा या मध्ये आहे. तशी ती झाल्यामुळे कोणती गोष्ट कधी, कुठे आणि कशी करायला हवी याचे अचूक निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे फायदे मिळवू शकता. योगा केल्यामुळे हे बदल आपोआप होत असतात तुम्हाला फक्त याची अनुभूती घ्यायची असते.

वजनात घट. याहून तुम्हाला अधिक काय पाहिजे ! योगाचा फायदा इथे सुद्धा होतो. सूर्य नमस्कार, कपाल भाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते योगाच्या सहाय्याने वजन कमी करा. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याची जाणीव आपल्याला होते. योग्य आहार घेतल्याने सुद्धा वजन नियंत्रणात रहायला मदत होते

रोगप्रतिकारक शक्तीत वाढ. शरीर, मन आणि आत्मा या तिघांचे मिळून एकसंघ अशी आपली यंत्रणा असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थपणाचे पडसाद जसे मनावर आघात करतात तसेच मानसिक अस्वस्थपणाचे परिणाम शरीरात रोगाच्या रूपाने प्रकट होतात. योगामुळे निरनिराळ्या अवयवांचे मर्दन केले जाते आणि त्यांचे स्नायू बळकट होतात. श्र्वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रामुळे आणि ध्यान धारणेमुळे शरीरात साठलेला ताण तणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढ

नाते संबंधात सुधारणा. तुमचा जोडीदार, आई वडील, मित्र किंवा तुमच्या लाडक्या व्यक्ती या सगळ्यांशी असेलेले नातेसंबंध योगामुळे सुधारतात . तणावमुक्त, आनंदी आणि समाधानी मन नात्यां सारख्या संवेदनशील संबंधात फार उपयोगी पडते. योगा आणि ध्यान धारणेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो.

उर्जा शक्ती वाढते. दिवसभराच्या कामाच्या धावपळीमुळे शेवटी तुम्हाला गलठून गेल्यासारखे वाटते कां? सतत दिवसभर काम करत राहिल्याने तुम्ही पार थकून जाता. तुमच्यात काही त्राण उरत नाही. परंतू रोज काही मिनिटे नियमित *योगाचा सरावादरम्यान
सूक्ष्म व्यायाम,
नंतर काही आसने ताडासन, ञिकोणासन ,भुजंगआसन,पर्वतासन,वज्रासन,बद्धकोनासन इत्यादि आसने,
त्यासोबतच दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम प्राणायाम, भस्रिका प्राणायाम ,कपालभाती सारखी शुद्धीक्रीया ,
सोबत शक्तीमुद्रा, प्राणमुद्रा मध्ये ध्यान केल्यास ताजेतवाने आणि उत्साही राहता येते…
दिवसभराच्या कामाच्या धबडग्यातून तुम्ही मध्येच १० मिनिटांचा वेळ काढून मार्गदर्शित ध्यान जरी केलेत तरी त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्यात परत उत्साह संचारेल आणि हातात घेतलेले काम तुम्ही तत्परतेने पुरे कराल.
असा हा योग दिवस फक्त एक दिवस न करता रोज च्या जीवनाचा भाग बनवून आपले आयुष्य आनंदी बनवा.
Dr.Pornima Kale.
BAMS
YOG TEACHER AND EVALUATOR AYUSH MINISTRY GOVERNMENT OF INDIA
INTERNATIONAL YOGA ALLIANCE TEACHER

Share this post